🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे
एक राजा होता. त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती. पण तो सुखी नव्हता. त्याला सतत वाटायचं कि मी दुःखी आहे. त्यामुळे तो अधिक दुःखी होत राहायचा. सतत विचार करून करून त्याचं डोकं फुटायची पाळी आली होती. मनात येणाऱ्या वेगवेगळ्या विचारांनी त्याला अगदी ग्रासून टाकलं होतं .
त्याच्यासोबत असणाऱ्या प्रधानाला ही गोष्ट कळली. त्याने राजाला विश्वासात घेऊन काळजीचं कारण विचारलं. तेव्हा राजाने सर्व हकीकत कथन केली. राजाने राजहकीमाला बोलावणं धाडलं . तरीही काहीही फायदा झाला नाही. गावोगावचे वैद्य येऊन आपापल्या परीने राजावर उपचार करु लागले होते. पण परिणाम शून्य दिसत होता.
आता अखेर काय करावे या विचारात राजा होता. तेव्हा त्याला कल्पना सुचली कि आपण दवंडी पिटावी. जो राजाचं दुःख दूर करेल त्याला एक हजार सुवर्णमुद्रा मिळणार असे त्याने जाहीर केले. दवंडी पिटविण्यात आली. दवंडी ऐकून अनेक वैद्य हकीम यांची गर्दी झाली.
सोन्याच्या मोहरांच्या लोभाने आलेले सर्व आपले उपचार करुन गेले. राजाच्या आजारावर कोणताही सकारात्मक फरक पडताना दिसत नव्हताच. एके दिवशी एक वयोवृद्ध म्हातारा गृहस्थ आला. त्याने राजाला भेटण्याची विनंती केली. राजा त्याला भेटला.
म्हातारा म्हणाला , “ तुला सुखी माणसाचे कपडे घालण्याची गरज आहे. ते जेव्हा परिधान करशील तेव्हाच तू सुखी होशील अन्यथा नाही. ” राजाला हे पटले. पण आता त्याच्यासमोर अजून एक प्रश्न निर्माण झाला होता. हा सुखी माणूस शोधायचा कुठे ?
दुसऱ्या दिवशी राजा सकाळी लवकरच उठून फिरण्यासाठी बाहेर पडला. दुपारपर्यंत सुखी माणसाला शोधून शोधून तो दमून एका झाडाखाली बसला . त्याला समोरच्या शेतात एक घामाने लथपथलेला शेतकरी नजरेस पडला. राजा त्याला भेटला. त्याला म्हणाला , “ तू सुखी आहेस का ? ” शेतकरी उत्तरला , “ हो मी सुखी आहे. मला कोणतंही दुःख नाही. सकाळी उठल्यापासून मी शेतात घाम गाळतो . भूक लागली कि काम थांबवतो. काय मिळेल ती चटणी भाकरी खातो. दगडाची उशी करुन सावली असेल त्या झाडाखाली शांत झोपी जातो. पुन्हा जाग आली कि उठतो आणि कामाला लागतो. त्यामुळे मला दुःख करायला वेळच मिळत नाही. मी जगातला सर्वात सुखी माणूस आहे. ”
शेतकऱ्याचे बोल ऐकून राजाला खरंच आश्चर्य वाटलं. आपल्याकडे एवढ्या सोयीसुविधा असतानाही आपण किती मोठं दुःख करत बसलो आहोत हे त्याला पटलं . कारण सुख हे मानण्यात असतं . त्या शेतकऱ्याने आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानलं. जे मिळालं आहे , तेच खूप आहे , असे समजून तो शेतकरी सुखी आहे. मी मात्र मला मिळालेले नाही त्याचा विचार करुन दिवसेंदिवस दुःखी होत चाललो आहे. राजाला सुखाचं रहस्य समजलं . तो राजवाड्यात गेला आणि आपल्या प्रजेची काळजी घेण्यासाठी खूप परिश्रम करण्याचे ठरविले. लवकरच राजा प्रजाहितदक्ष म्हणून गौरविला जाऊ लागला. आता राजाला सुखी माणसाच्या कपड्यांची अजिबात गरज नव्हती , कारण त्याचा दृष्टीकोन बदलून गेला होता.
🔹 प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक, शिडवणे नं. 1
No comments:
Post a Comment