देवाच्या निर्णयावर कधी नाराज होऊ नका
नमस्कार , कोणीतरी खूप चांगलं सांगितलं आहे , “ देवाच्या निर्णयावर कधीही नाराज होऊ नका. देव तुम्हाला बरं वाटेल असं कधी करत नाही , तर असं काही करतो जे तुमच्यासाठी अतिशय योग्य असतं.
एक सेल्स मॅनेजर होता. तो एका कंपनीमध्ये दोन अडीज वर्षं काम करत होता. तो प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानायचा. त्याला वाटायचं कि त्याची नोकरी ही देवाच्या कृपेने मिळालेली आहे. त्यामुळे तो प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानायचा. घरातून निघताना देवाला नमस्कार करायचा. घरी आला कि मनोभावे नमस्कार करायचा. हा त्याचा दिनक्रमच होता म्हणा ना !! प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनेच घडते यावर त्याचा अढळ विश्वास होता. त्याचा अध्यात्मावर कमालीचा विश्वास होता. कधी त्याच्या बाबतीत वाईट घडलं तर तो म्हणायचा , “ समजत नाही देवाच्या मनात काय आहे ? ”
दोन अडीज वर्षे कंपनीत काम करूनसुद्धा त्याचा पगार वाढत नव्हता. त्यामुळे तो विचार करु लागला कि कुठेतरी दुसरी चांगली नोकरी मिळायला हवी. त्याला एकदा असं समजलं कि एका ठिकाणी चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कंपनीकडून त्याला फोनही आला कि लवकरच तुम्हाला आम्ही बोलावू. त्यामुळे हा अस्वस्थ झाला आणि आनंदीतही झाला. जुन्या कंपनीत कमी पगारावर काम करुन तो कंटाळला होता. नवीन नोकरीत चांगला पगार मिळणार याची त्याला अपेक्षा होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्यासाठी त्याने अलार्म लावून ठेवला. नवीन नोकरीच्या मुलाखतीची तो मनातल्या मनात उजळणी करत होता. पण दुसऱ्या दिवशी तो ज्यावेळी उठला आणि बघतो तर अलार्म कधीच वाजून गेला होता. त्याने सकाळी पाचचा अलार्म लावला होता आणि साडे सात वाजता उठला होता. त्यामुळे त्याला आज बराच उशीर झाला होता. तो स्वतःवरच रागावला होता. अलार्मप्रमाणे उठता आले नाही म्हणून तो संतापला होता. त्याने तरीही पटापट तयारी केली. आपली गाडी काढली. पण ती सुरु होईना. बराच प्रयत्न करुनही ती सुरु झाली नाहीच. गाडी तशीच लावून त्याने रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. खूप प्रयत्नाने रिक्षा मिळाली.
ऑफिसमध्ये खूप उशिरानेच पोहोचला. खूप रागात होता. त्याने ऑफिसचं काम सुरु केलं होतं . तरीही त्याचं लक्ष नवीन नोकरीच्या कॉलकडे होतं. या कंपनीतून बाहेर पडायला मिळणार या एकाच विचाराने तो प्रफुल्लित होत असे आणि फोन आला नाही म्हणून नाराजही होत असे. दुपारच्या भोजनाची वेळ झाली तरी कॉल काही आलाच नाही. तो ऑफिसच्या कँटीनमध्ये जेवायला गेला. सकाळी घरातून गडबडीत निघाल्याने तो आपला डबा घरीच विसरून गेला होता. पण आज कँटीनला कुलूप होते. कँटीन बंद !!! त्याला खूपच वाईट वाटलं. तो मनातल्या मनात स्वतःवर चरफडत होता. म्हणत होता , “ अरे देवा , काय हा दिवस आहे ? एकदमच वाईट !!! ” कुठूनतरी त्याने सॅन्डविचची ऑर्डर मागवली. सॅन्डविच आलं. पण तेही खाण्यालायक नव्हतं. ते त्याने अर्धच खाल्लं आणि फेकून दिलं. तो स्वतःशीच पुटपुटला , “ आज मला नीट जेवायला सुद्धा मिळत नाहीय ”
संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान त्याला कॉल आला. तो फोन नवीन कंपनीमधूनच होता. तो आनंदित होऊन बोलायला लागला. अचानक फोन कट झाला. त्याने आपला फोन बघितला तर तोही डिस्चार्ज झाला होता. त्याला खूप राग येत होता , “ अरे , आज काल झालं , आजच या फोनला बंद व्हायचं होतं ? ” आणि दिवस संपला होता.
तो आता घरी जायला निघाला होता. विचार करत होता कि घरी गेल्यावर मस्त आराम करायचा , दिवसभर त्याचं डोकं नुसतं भणभणत होतं. घरी पोचला. जेवला. अंथरुणावर पडला. तेवढ्यात लाईट गेली. आता त्याचा राग खूपच अनावर झाला होता. तो म्हणाला , “ अरे देवा , मी तुला इतका मानतो , तू माझ्यासोबत असा काय वागतोयस !! ” रागात त्याला कधी झोप लागली ते समजलं देखील नाही. तो स्वप्नात देवाबरोबर बोलायला लागला होता. तो देवाला म्हणत होता , “ देवा , तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा ठेवून आहात ? मी तुमचा निस्सीम भक्त आहे . नित्य नियमाने पुजा व्रत पार पाडतो आहे. तरीही तुम्ही माझ्याशी असे कसे काय वागू शकता ? आजचा माझा दिवस किती वाईट गेला माहित आहे ? सकाळी अलार्म नाही वाजला . माझी गाडी खराब झाली. रिक्षा कशीतरी मिळाली. डबा घ्यायला विसरलो. कँटीन बंद होती. सॅन्डविच खराब होतं. नोकरीचा कॉल आला तर माझा फोनच बंद झाला. घरी येऊन झोपतो तर लाईट गेली. असे काय वागताय माझ्याशी ? ”
देव म्हणाला , “ आज जे तुझ्यासोबत घडलं , ते मीच घडवून आणलं. मी जाणूनबुजून तुझ्या अलार्मचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचवला नाही. तुझी गाडी मीच बंद करुन ठेवली. मलाच तू ऑफिसात उशिरा पोहोचायला हवा होतास. गाडीने गेला असतास तर आज तुझा मोठा अपघात होणार होता. तुझ्या नशिबात अपघात लिहून ठेवला होता. चांगलं झालं कि कँटीन बंद होती. त्यामधलं जेवण खराब होतं , जे खाल्ल्याने तू आजारी पडला असतास !!! आणि जो नोकरीचा कॉल तुला आला होता , जो कट झाल्याने तू अस्वस्थ झालास !!! तो कंपनीवाला एक नंबरचा भ्रष्टाचारी आहे. तुला नोकरीवर ठेवून कायमचा फसविण्याचा त्याचा डाव होता. म्हणून तो कॉल मी कट केला आणि तुझा फोन डिस्चार्ज करुन टाकला. आणि आज घरातली लाईट गेली , तीही मीच घालवली. कारण त्यामुळे तुझ्या घरात शॉर्टसर्किटने आग लागणार होती. तू माझा निस्सीम भक्त आहेस म्हणून मी तुला स्वप्नात येऊन हे सगळं सांगतोय !!! आणि लक्षात ठेव , माझ्यावर जर तू विश्वास ठेवतोस , तर सतत विश्वास ठेवत जा. जीवनात तुझं कधीही वाईट होणार नाही यासाठीच माझे प्रयत्न असतात. ” अचानक त्याची झोप उडाली. तो स्वप्नातून बाहेर आला. तो देवाचे आभार मानायला लागला.
जीवन जगताना खूपवेळा आपल्याला वाटतं कि माझ्यासोबत खूप चुकीचं घडलं , वाईट घडलं , असं घडता नये होतं . पण जर आपण काही वर्षे मागे वळून पाहिलं , तर नक्कीच वाटेल कि जे घडलं ते बरोबरच घडलं , आपल्या फायद्यासाठीच घडलं. म्हणूनच आपण प्रत्येकाने प्रत्येक क्षणासाठी देवाचे आभार मानायला शिकलं पाहिजे.
या गोष्टीतून आपण हाच धडा घेऊ शकतो कि देव असं घडवत नाही , जे आपल्याला हवं असतं , तो असं घडवत असतो , जे आपल्यासाठी योग्य असतं.
© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १