Thursday, March 13, 2025

🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे

 🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे 

एक राजा होता. त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती. पण तो सुखी नव्हता. त्याला सतत वाटायचं कि मी दुःखी आहे. त्यामुळे तो अधिक दुःखी होत राहायचा. सतत विचार करून करून त्याचं डोकं फुटायची पाळी  आली  होती. मनात येणाऱ्या वेगवेगळ्या विचारांनी त्याला अगदी ग्रासून टाकलं होतं . 

त्याच्यासोबत असणाऱ्या प्रधानाला ही गोष्ट कळली. त्याने राजाला विश्वासात घेऊन काळजीचं कारण विचारलं. तेव्हा राजाने सर्व हकीकत कथन केली. राजाने राजहकीमाला बोलावणं धाडलं . तरीही काहीही फायदा झाला नाही. गावोगावचे वैद्य येऊन आपापल्या परीने राजावर उपचार करु लागले होते. पण परिणाम शून्य दिसत होता. 

आता अखेर काय करावे या विचारात राजा होता. तेव्हा त्याला कल्पना सुचली कि आपण दवंडी पिटावी. जो राजाचं दुःख दूर करेल त्याला एक हजार सुवर्णमुद्रा मिळणार असे त्याने जाहीर केले. दवंडी पिटविण्यात आली. दवंडी ऐकून अनेक वैद्य हकीम यांची गर्दी झाली. 

सोन्याच्या मोहरांच्या लोभाने आलेले सर्व आपले उपचार करुन गेले. राजाच्या आजारावर कोणताही सकारात्मक फरक पडताना दिसत नव्हताच. एके दिवशी एक वयोवृद्ध म्हातारा गृहस्थ आला. त्याने राजाला भेटण्याची विनंती केली. राजा त्याला भेटला. 

म्हातारा म्हणाला , “ तुला सुखी माणसाचे कपडे घालण्याची गरज आहे. ते जेव्हा परिधान करशील तेव्हाच तू सुखी होशील अन्यथा नाही. ” राजाला हे पटले. पण आता त्याच्यासमोर अजून एक प्रश्न निर्माण झाला होता. हा सुखी माणूस शोधायचा कुठे ? 

दुसऱ्या दिवशी राजा सकाळी लवकरच उठून फिरण्यासाठी बाहेर पडला. दुपारपर्यंत सुखी माणसाला शोधून शोधून तो दमून एका झाडाखाली बसला . त्याला समोरच्या शेतात एक घामाने लथपथलेला शेतकरी नजरेस पडला. राजा त्याला भेटला. त्याला म्हणाला , “ तू सुखी आहेस का ? ” शेतकरी उत्तरला , “ हो मी सुखी आहे. मला कोणतंही दुःख नाही. सकाळी उठल्यापासून मी शेतात घाम गाळतो . भूक लागली कि काम थांबवतो. काय मिळेल ती चटणी भाकरी खातो. दगडाची उशी करुन सावली असेल त्या झाडाखाली शांत झोपी जातो. पुन्हा जाग आली कि उठतो आणि कामाला लागतो. त्यामुळे मला दुःख करायला वेळच मिळत नाही. मी जगातला सर्वात सुखी माणूस आहे. ”

शेतकऱ्याचे बोल ऐकून राजाला खरंच आश्चर्य वाटलं. आपल्याकडे एवढ्या सोयीसुविधा असतानाही आपण किती मोठं दुःख करत बसलो आहोत हे त्याला पटलं . कारण सुख हे मानण्यात असतं . त्या शेतकऱ्याने आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानलं. जे मिळालं आहे , तेच खूप आहे , असे समजून तो शेतकरी सुखी आहे. मी मात्र मला मिळालेले नाही त्याचा विचार करुन दिवसेंदिवस दुःखी होत चाललो आहे. राजाला सुखाचं रहस्य समजलं . तो राजवाड्यात गेला आणि आपल्या प्रजेची काळजी घेण्यासाठी खूप परिश्रम करण्याचे ठरविले. लवकरच राजा प्रजाहितदक्ष म्हणून गौरविला जाऊ लागला. आता राजाला सुखी माणसाच्या कपड्यांची अजिबात गरज नव्हती , कारण त्याचा दृष्टीकोन बदलून गेला होता. 


🔹 प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक, शिडवणे नं. 1




⭕ स्वतःवर विश्वास ठेवा

 ⭕ स्वतःवर विश्वास ठेवा


          एक राहुल नावाचा मुलगा खूप प्रयत्न करुन सुद्धा पुढच्या वर्गात जात नव्हता. गेला तरी एका वर्गात दोन वर्षं तरी त्याला लागत. त्याचा आत्मविश्वास कमकुवत होत चालला होता. 

          त्याने खूप प्रयत्न करुन पास होत शिक्षक बनला. शाळेवर त्याने मुलांवर अध्यापन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला नीट शिकविता येत नाही म्हणून शाळेनेच काढून टाकले. तो खूप नाराज झाला. 

          त्याचे नीताशी लग्न झाले. नीता एक आत्मविश्वासू मुलगी होती. राहुलच्या या दुःखाची तिला कल्पना होती. तिने त्याला पुढे जाण्यासाठी प्रत्येकवेळी प्रेरणा दिली होती. ती म्हणाली, " ज्यावेळी आपल्याला पुढे जाण्यासाठी अडथळे येतात, त्यावेळी परमेश्वर आपल्याला काही अवधी देत असतो. त्यावेळेत आपण नक्की यशस्वी होण्याचा प्रयत्न करायला हवा. आत्मविश्वास ठेवायला हवा. न्यूनगंड सोडून द्यायला हवा. परमेश्वर आपल्याला नक्कीच चांगलं मिळवून देण्याची तयारी करीत असतो. आपल्याला संयम ठेवता यायला हवा. "

          राहुल तरीही स्वतः साशंक असतो. त्यामुळे तो असफल होत असतो. एकदा त्याला कल्पना सुचते. तो मूकबधिरांच्या शाळेत जातो. तो तिथे त्या मुलांना शिकविण्याचे तंत्र अवगत करतो. मुले त्याच्यावर खुश होतात. त्याने शिकविलेले मुलांना समजू लागते. त्या दिव्यांग शाळेचे प्राचार्य राहुलला  अध्यापक म्हणून नेमणूक देतात. राहुलचा आत्मविश्वास आता चांगलाच वाढत जातो. मुलांना चांगलं तयार करताना तो नेहमीच भान हरपून काम करत राहतो. 

          आता तो आपली स्वतःची शाळा उघडतो. त्यात मूकबधिरांना प्रवेश देतो. राहुलने अशा अनेक शाळा सुरु केलेल्या असतात. प्रत्येक शाळेत त्याला यश मिळत जातं. आता तो मूकबधिरांसाठी संसाधने बनविण्यासाठी विचार करु लागतो. 

          मूकबधिरांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या उपकरणांना निर्माण करण्याचे तंत्र शिकून घेऊन तो त्यातही यशस्वी होतो. त्याची पत्नी त्याला प्रत्येक यश आणि अपयशात पाठीशी उभी असते. 

          राहुलला आता समजलेलं असतं कि कोणतीही जमीन नापिक नसते, त्यात कोणतं बीज लावायचं हे आपल्याला समजायला लागतं. ते एकदा समजलं कि यश मिळत जातं. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. 


🔹 प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शिडवणे नं. 1


🔴 भुतदया असायलाच हवी

 🔴 भुतदया असायलाच हवी 

नमस्कार मुलांनो , एकदा एक ऑफिसर आपल्या पत्नीसमवेत फेरफटका मारत होते. त्यावेळी वाटेत एक जंगल होते. जंगलात झाडांवर पक्ष्यांनी सुंदर घरटी बांधली होती. त्यात सुगरण पक्ष्यांची घरटी लक्षवेधक होती. ऑफिसरच्या पत्नीला ती घरटी खूपच आवडली. 

ती आपल्या अधिकारी पतीला म्हणाली , “ आपल्या घरात ही घरटी सुशोभनासाठी वापरली तर घराची शोभा आणखी वाढेल. ” अधिकारी पतीलाही तिचे म्हणणे पटले. अधिकारी महाशयांनी जवळच असणाऱ्या एका गावरान मुलाला बोलावून घेतले. त्याला म्हटले , “ बाळा , मला या घरट्यांमधली दोन तीन घरटी काढून दे. मी तुला त्याबदल्यात मोबदला देतो. ” त्या मुलाने त्या घरट्यांकडे पाहिले व म्हणाला , “ साहेब , मी तुम्हाला ही घरटी नक्कीच काढून दिली असती , पण सध्या त्यात सुगरणीची छोटी छोटी पिल्ले राहत आहेत. तिची आई सायंकाळी खाऊ घेऊन येईल , तेव्हा तिला आपली पिल्ले दिसणार नाहीत, तेव्हा तिला जे दुःख होईल , ते दुःख मला सहन होणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला यातील कोणतीही घरटी काढून देऊ शकत नाही. मला तुमचा मोबदला नको. ”

अधिकारी आणि त्याची पत्नी दोघेही उच्चविद्याविभुषित होते. त्यांना ‘ प्राणिमात्रांवर दया करावी ‘ ही गोष्ट माहिती होती. तरीही या न शिकलेल्या गावरान मुलाकडून त्यांना ‘ भुतदया ‘ शिकायला मिळाली. मुलाच्या या भुतदयेबद्दल दांपत्याच्या मनात आदर निर्माण झाला आणि त्यांनी त्याला खूप सारे खाऊ देऊन मनोमन आभार मानले. मुलगासुद्धा त्यांना दुवा देत आपल्या वाटेने निघून गेला. 

बालमित्रांनो , आपल्याला आपल्या सभोवती असलेल्या निसर्गातील प्राण्यांबद्दल , पक्ष्यांबद्दल अशीच अपार दया असली पाहिजे. आपल्यापासून त्यांना कोणताही त्रास होईल असे पण वागता कामा नये. या मुक्या प्राण्यांना बोलता येत नसले तरी त्यांच्यावर माया केलीत तर तेही तुमच्यावर जिवापाड प्रेम करतात याचाही तुम्हाला अनेकदा अनुभव आला असेल. त्यामुळे तुमच्या मनात प्राणिमात्रांबद्दल जे प्रेम असते त्याला भुतदया असे म्हणतात. भुतांवर दया करणे म्हणजे भुतदया नव्हे हं  !!!


© प्रवीण अशितोष कुबल , प्राथमिक शिक्षक 


🔴स्वतःची कामे स्वतःच करा

 🔴स्वतःची कामे स्वतःच करा 

नमस्कार मुलांनो , तुम्हाला गुरुजींच्या आणि शिष्यांच्या गोष्टी आवडत 

असतीलच ना !!! एकदा एक गुरुजी आपल्या शिष्यांना घेऊन दुर निघाले होते. वाटेत त्यांना एक गटार लागले. ज्यातून खूप घाणेरडे पाणी वाहून जाताना दिसत होते. त्यावर पूल बांधलेला नव्हता. त्यामुळे त्यावरुन उडी मारुन जावे लागणार होते. 

सर्व शिष्यांनी उड्या मारुन पलीकडे जाण्याचं कार्य पूर्ण केलं. आता गुरुजींची पाळी आली होती. गुरुजी उडी मारुन गेले. परंतु उडी मारताना त्यांच्या हातातलं कमंडलू मात्र निसटून खाली गटारात पडलं. आता ते खूप खाली गेलं होतं . वाहून जात असल्याने ते दिसेनासं झालं. सगळे शिष्य हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी पाहात राहिले होते. कोणाचेही धाडस ते कमंडलू बाहेर काढण्यासाठी होताना दिसत नव्हतं. 

गुरुजींनी सर्व मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले होते. पण आज मात्र त्यांचा एकही शिष्य त्यापैकी काहीही करायला तयार होताना दिसत नव्हता. अखेर त्यातील एक शिष्य म्हणाला , “ गुरुजी , मी गावात जातो आणि आपले कमंडलू बाहेर काढणारा माणूस घेऊन येतो. ” गुरुजींना वाटले होते कि हा आपला शिष्य स्वतः गटारात उडी मारणार आणि आपला कमंडलू बाहेर काढणार. पण त्यांचा हा विचारही अमलात आणला गेला नव्हता. 

इतक्यात गुरुजींचा एक पट्टशिष्य धावतच तिथे आला. त्याने पाहिलं कि आपल्या गुरुजींचं कमंडलू गटारात पडलं आहे आणि ते सापडत नाही. ते शोधून काढणं हे आपलं परमकर्तव्य आहे. त्याने त्या घाण वास येणाऱ्या गटारात थेट उडी मारली आणि अधिक खोलात गेल्यावर त्याला गुरुजींचं कमंडलू सापडलं. त्याने ते अतिशय उत्साहात गुरुजींकडे आणून दिलं तेव्हा गुरुजींचे इतर सर्व शिष्य आ वासून पाहण्यापलीकडे काहीही करु शकत नव्हते. 

तो शिष्य गुरुजींना म्हणाला , “ गुरुजी , मी तुमचं कमंडलू बाहेर काढून देऊन खूप मोठे उपकार केलेले नाहीत. तुम्ही आम्हाला इतकी वर्षं अध्यापन करत आहात. तेव्हा तुम्ही आम्हाला शिकविलेल्या गोष्टीचा आज खऱ्या अर्थाने व्यावहारिक उपयोग झालेला आहे. मलाही तुम्हाला केलेल्या सहकार्यामुळे झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. ” कमंडलू काढणारा माणूस शोधणारा शिष्य देखील आला , तेव्हा त्यालाही आपली लाज वाटली. कारण तो कोणाही माणसाला न आणता रिकामाच आला होता. 

मित्रांनो , आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येत असतात. आपण आपलीच कामे करायला कचरतो. आपली कामे दुसऱ्यांकडून करुन घेण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवलं पाहिजे कि कितीही काहीही झालं तरी आपली कामे आपल्यालाच करायची आहेत. त्यासाठी कधीच दुसऱ्यांवर विसंबून राहायचे नाही. कारण म्हणतात ना !!! जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. 


© प्रवीण अशितोष कुबल , प्राथमिक शिक्षक 


🔴 तुमच्यात माणुसकी असली पाहिजे

🔴 तुमच्यात माणुसकी असली पाहिजे 


नमस्कार मुलांनो , एकदा एक मोठ्या पदावरील साहेब आपल्या मुलाला घेऊन आपल्या भारीवाल्या गाडीने निघाले होते. मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांच्या पदाप्रमाणे त्यांच्यात अहंकार ठासून भरलेला होता. त्यामुळे आपल्या मुलालासुद्धा ते आपल्या पदाची आन , बान आणि शान समजून सांगत होते. मुलगा बिचारा ऐकत बसला होता. सगळ्याच गोष्टी समजण्याइतका तो मोठाही नव्हता. 

त्या साहेबांनी सीट बेल्ट घातला नव्हता. मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांना सीट बेल्ट कोणीही विचारणार नाही असा त्यांचा समज होता. एका वाहतुक पोलिसाने त्यांची गाडी अडवली. सीट बेल्ट बांधण्यासाठी विनंती केली. नाही बांधला तर चलन भरावे लागेल असेही सांगितले. परंतु मोठ्या पदावर असलेल्या साहेबांनी त्या पोलिसाला आपल्या पदाचा धाक दाखवला. आपल्या वरपर्यंत ओळखी आहेत असे सांगितले. पण वाहतूक पोलिसाने तरीही सीट बेल्ट बांधण्यासाठी आग्रह धरलाच. शेवटी नाईलाजास्तव त्यांना सीट बेल्ट बांधणं भाग पडलं. हे सर्व तो छोटा मुलगा पाहत होता. आपल्या बाबांच्या या वागण्याचा त्याच्या बालमनावर चांगला परिणाम होत नव्हता. 

गाडी पुढे निघाली. थोड्याच वेळात मागून मोठा आवाज झाला होता. साहेबांना गाडी थांबवावी लागली. मागे बघितलं तर एका गाडीने एका वृद्ध गृहस्थाला उडवलं होतं. त्या वाहतूक पोलिसाने मोठ्या साहेबांना विनंती केली , पण त्यांनी या अपघात झालेल्या वृद्धाला दवाखान्यात नेण्यास नकार दिला. अपघाती वृद्धाला तसंच टाकून आपली गाडी त्यांनी पुढे दामटली. 

बिचारा वाहतूक पोलीस नाराज झाला. त्याला त्या वृद्धाचे प्राण वाचवायचे होते. त्याने त्या वृद्धाला उचलले , चारशे ते पाचशे मीटरवर त्याला रुग्णवाहिका  मिळाली , त्याने त्या वृद्धाला हॉस्पिटलाईज केले. 

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्या वाहतुक पोलिसाचा फोटो पहिल्या पानावर छापून आला होता. त्याने एका वृद्धाचे प्राण वाचवले होते. साहेबांच्या घरीही पेपर आला होता. छोट्या मुलाने ती बातमी आपल्या साहेब असलेल्या बाबांना दाखवली. मुलाच्या मनात आपल्या बाबांविषयीचा आदर कमी झालेला त्यांना दिसला. साहेब बाबांनी मुलाकडे क्षमा मागितली आणि आपण चुकीचे असल्याचे मान्य केले. 

या गोष्टीवरून आपल्या असे लक्षात येते कि आपल्याकडे किती पैसा आहे किंवा कोणते पद आहे हे महत्त्वाचे नसून आपण माणसांशी माणसांसारखे वागतो का हे अधिक महत्त्वाचे असते. 


© प्रवीण अशितोष कुबल , प्राथमिक शिक्षक 


 

तुमची प्रत्येक चूक तुम्हाला शिकवून जाते

 🔴तुमची प्रत्येक चूक तुम्हाला शिकवून जाते 


नमस्कार मुलांनो , पालकांनो आणि वाचकांनो , योग्य निर्णय घेणं खरंच खूप कठीण असतं. पण त्यापेक्षाही अधिक कठीण असतं , योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. 

दोन अरबी मित्रांची  गोष्ट आहे. त्यांना एका नकाशामध्ये असं समजलं कि दूर रेगीस्तानात खूप मोठा खजिना लपलेला आहे. आता दोन्ही मित्रांनी योजना आखायला सुरुवात केली होती. आपण कसं पोचायचं खजिन्यापर्यंत याचा दोघेही विचार करायला लागले होते. आपल्याला तो खजिना मिळालाच पाहिजे अशी दोघेही मित्र अपेक्षा बाळगून होते. 

खजिना खूप दूर होता. त्याच्यापर्यंत पोहोचणं खूप वेळखाऊ होतं. तसंच रेगीस्तानात मुबलक पाणीसुद्धा मिळणार नाही. तहानभुकेने व्याकुळ व्हायला होईल , कदाचित मरण येऊ शकतं ही भीतीसुद्धा त्यांना वाटत होतीच. त्यामुळे दोघांनीही असा निर्णय घेतला कि या कामामध्ये आपण अजून एकाला सामील करुन घेऊयात. त्यामुळे तिघांना तीन उंट नेता येणार होते. जास्तीचं सामानही नेता येणार होतं. येताना तिघांना जास्त खजिना आणता येणार होता. 

त्यांचे दोन मित्र होते. त्यांची नावे होती राम आणि श्याम. आता या दोघांपैकी कोणाला घेऊन जायचं हा त्यांना प्रश्न पडला होता. हे ठरवणं त्यांना कठीण जात होतं. कारण दोघांच्या क्षमता सारख्याच दिसत होत्या. मग त्यांनी ठरवलं कि दोघांमध्ये एक स्पर्धा घ्यायची आणि त्यातून कोणा एकालाच न्यायचं ते ठरवायचं होतं. त्यात जो यशस्वी होईल त्यालाच आपल्या सिक्रेट मिशनबद्दल सांगायचं होतं. स्पर्धा अशी होती कि दोघांनाही रेगीस्तानातील उंटावर बसविण्यात आलं होतं. त्यांना सांगण्यात आलं होतं कि असंच पुढे पुढे जायचं आणि योग्य रस्ता शोधायचा. 

दोघेही पुढे पुढे गेले. खूप पुढे गेल्यानंतर त्यातला राम डाव्या बाजूला जायला निघाला. श्याम मात्र तिथेच थांबून राहिला. त्याला कुठे जायचं ते समजेना. तो द्विधा मनस्थितीत होता. थोड्या वेळाने राम परत निघून आला आणि तिकडे जाऊ शकत नाही असे सांगू लागला. कारण त्या बाजूला खूप मोठ्या समस्या होत्या. त्यामुळे तो त्या समस्यांना पार केल्यामुळे परत आला. श्याम मात्र तिथेच थांबून राहिल्याने त्याला कोणता रस्ता चांगला किंवा योग्य हे सांगता येत नव्हते. 

राम आणि श्याम कोठे जात होते यावर दोन्ही अरबी मित्रांचे लक्ष होतेच. त्यांनी या दोन मित्रांमधून रामची निवड केली. श्यामला समजेना. चुकीच्या रस्त्याला जाणाऱ्या रामची निवड त्याला योग्य वाटेना. दोन्ही अरबी मित्रांनी त्याला नीट समजावून सांगितले. आपल्याला काय करायचे नाही , हे आधी समजले पाहिजे , तर आणि तरच आपण काय करायचे आहे हे समजू शकतो. रामने तेच केलं होतं. त्याने चुकीचा रस्ता शोधून काढला , त्यामुळे बरोबर रस्ता कोणता आहे , हे त्यानेच ठरवले होते. म्हणून रामची केलेली निवड योग्यच असल्याचे श्यामलाही पटले. 

मित्रांनो , आपण सुद्धा जीवनात असे अनेक चुकीचे मार्ग निवडलेले असू शकतो , पण वेळीच आपल्याला समजलं , तर आपण त्या अयोग्य मार्गांचा त्याग करुन योग्य मार्गावर येऊ शकतो. म्हणूनच म्हणतात , “ तुमची प्रत्येक चूक तुम्हाला शिकवून जाते . ”


© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १


देवाच्या निर्णयावर कधी नाराज होऊ नका

 देवाच्या निर्णयावर कधी नाराज होऊ नका 


नमस्कार , कोणीतरी खूप चांगलं सांगितलं आहे , “ देवाच्या निर्णयावर कधीही नाराज होऊ नका. देव तुम्हाला बरं वाटेल असं कधी करत नाही , तर असं काही करतो जे तुमच्यासाठी अतिशय योग्य असतं. 

एक सेल्स मॅनेजर होता. तो एका कंपनीमध्ये दोन अडीज वर्षं काम करत होता. तो प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानायचा. त्याला वाटायचं कि त्याची नोकरी ही देवाच्या कृपेने मिळालेली आहे. त्यामुळे तो प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानायचा. घरातून निघताना देवाला नमस्कार करायचा. घरी आला कि मनोभावे नमस्कार करायचा. हा त्याचा दिनक्रमच होता म्हणा ना !! प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनेच घडते यावर त्याचा अढळ विश्वास होता. त्याचा अध्यात्मावर कमालीचा विश्वास होता. कधी त्याच्या बाबतीत वाईट घडलं तर तो म्हणायचा , “ समजत नाही देवाच्या मनात काय आहे ? ”

दोन अडीज वर्षे कंपनीत काम करूनसुद्धा त्याचा पगार वाढत नव्हता. त्यामुळे तो विचार करु लागला कि कुठेतरी दुसरी चांगली नोकरी मिळायला हवी. त्याला एकदा असं समजलं कि एका ठिकाणी चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कंपनीकडून त्याला फोनही आला कि लवकरच तुम्हाला आम्ही बोलावू. त्यामुळे हा अस्वस्थ झाला आणि आनंदीतही झाला. जुन्या कंपनीत कमी पगारावर काम करुन तो कंटाळला होता. नवीन नोकरीत चांगला पगार मिळणार याची त्याला अपेक्षा होती. 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्यासाठी त्याने अलार्म लावून ठेवला. नवीन नोकरीच्या मुलाखतीची तो मनातल्या मनात उजळणी करत होता. पण दुसऱ्या दिवशी तो ज्यावेळी उठला आणि बघतो तर अलार्म कधीच वाजून गेला होता. त्याने सकाळी पाचचा अलार्म लावला होता आणि साडे सात वाजता उठला होता. त्यामुळे त्याला आज बराच उशीर झाला होता. तो स्वतःवरच रागावला होता. अलार्मप्रमाणे उठता आले नाही म्हणून तो संतापला होता. त्याने तरीही पटापट तयारी केली. आपली गाडी काढली. पण ती सुरु होईना. बराच प्रयत्न करुनही ती सुरु झाली नाहीच. गाडी तशीच लावून त्याने रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. खूप प्रयत्नाने रिक्षा मिळाली. 

ऑफिसमध्ये खूप उशिरानेच पोहोचला. खूप रागात होता. त्याने ऑफिसचं काम सुरु केलं होतं . तरीही त्याचं लक्ष नवीन नोकरीच्या कॉलकडे होतं. या  कंपनीतून बाहेर पडायला मिळणार या एकाच विचाराने तो प्रफुल्लित होत असे आणि फोन आला नाही म्हणून नाराजही होत असे. दुपारच्या भोजनाची वेळ झाली तरी कॉल काही आलाच नाही. तो ऑफिसच्या कँटीनमध्ये जेवायला गेला. सकाळी घरातून गडबडीत निघाल्याने तो आपला डबा घरीच विसरून गेला होता. पण आज कँटीनला कुलूप होते. कँटीन बंद !!! त्याला खूपच वाईट वाटलं. तो मनातल्या मनात स्वतःवर चरफडत होता. म्हणत होता , “ अरे देवा , काय हा दिवस आहे ? एकदमच वाईट !!! ” कुठूनतरी त्याने सॅन्डविचची ऑर्डर मागवली. सॅन्डविच आलं. पण तेही खाण्यालायक नव्हतं. ते त्याने अर्धच खाल्लं आणि फेकून दिलं. तो स्वतःशीच पुटपुटला , “ आज मला नीट जेवायला सुद्धा मिळत नाहीय ” 

संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान त्याला कॉल आला. तो फोन नवीन कंपनीमधूनच होता. तो आनंदित होऊन बोलायला लागला. अचानक फोन कट झाला. त्याने आपला फोन बघितला तर तोही डिस्चार्ज झाला होता. त्याला खूप राग येत होता , “ अरे , आज काल झालं , आजच या फोनला बंद व्हायचं होतं ? ” आणि दिवस संपला होता. 

तो आता घरी जायला निघाला होता. विचार करत होता कि घरी गेल्यावर मस्त आराम करायचा , दिवसभर त्याचं डोकं नुसतं भणभणत होतं. घरी पोचला. जेवला. अंथरुणावर पडला. तेवढ्यात लाईट गेली. आता त्याचा राग खूपच अनावर झाला होता. तो म्हणाला , “ अरे देवा , मी तुला इतका मानतो , तू माझ्यासोबत असा काय वागतोयस !! ” रागात त्याला कधी झोप लागली ते समजलं देखील नाही. तो स्वप्नात देवाबरोबर बोलायला लागला होता. तो देवाला म्हणत होता , “ देवा , तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा ठेवून आहात ? मी तुमचा निस्सीम भक्त आहे . नित्य नियमाने पुजा व्रत पार पाडतो आहे. तरीही तुम्ही माझ्याशी असे कसे काय वागू शकता ? आजचा माझा दिवस किती वाईट गेला माहित आहे ? सकाळी अलार्म नाही वाजला . माझी गाडी खराब झाली. रिक्षा कशीतरी मिळाली. डबा घ्यायला विसरलो. कँटीन बंद होती. सॅन्डविच खराब होतं. नोकरीचा कॉल आला तर माझा फोनच बंद झाला. घरी येऊन झोपतो तर लाईट गेली. असे काय वागताय माझ्याशी ? ”

देव म्हणाला , “ आज जे तुझ्यासोबत घडलं , ते मीच घडवून आणलं. मी जाणूनबुजून तुझ्या अलार्मचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचवला नाही. तुझी गाडी मीच बंद करुन ठेवली. मलाच तू ऑफिसात उशिरा पोहोचायला हवा होतास. गाडीने गेला असतास तर आज तुझा मोठा अपघात होणार होता. तुझ्या नशिबात अपघात लिहून ठेवला होता. चांगलं झालं कि कँटीन बंद होती. त्यामधलं जेवण खराब होतं , जे खाल्ल्याने तू आजारी पडला असतास !!! आणि जो नोकरीचा कॉल तुला आला होता , जो कट झाल्याने तू अस्वस्थ झालास !!! तो कंपनीवाला एक नंबरचा भ्रष्टाचारी आहे. तुला नोकरीवर ठेवून कायमचा फसविण्याचा त्याचा डाव होता. म्हणून तो कॉल मी कट केला आणि तुझा फोन डिस्चार्ज करुन टाकला. आणि आज घरातली लाईट गेली , तीही मीच घालवली. कारण त्यामुळे तुझ्या घरात शॉर्टसर्किटने आग लागणार होती. तू माझा निस्सीम भक्त आहेस म्हणून मी तुला स्वप्नात येऊन हे सगळं सांगतोय !!! आणि लक्षात ठेव , माझ्यावर जर तू विश्वास ठेवतोस , तर सतत विश्वास ठेवत जा. जीवनात तुझं कधीही वाईट होणार नाही यासाठीच माझे प्रयत्न असतात. ” अचानक त्याची झोप उडाली. तो स्वप्नातून बाहेर आला. तो देवाचे आभार मानायला लागला. 

जीवन जगताना खूपवेळा आपल्याला वाटतं कि माझ्यासोबत खूप चुकीचं घडलं , वाईट घडलं , असं घडता नये होतं . पण जर आपण काही वर्षे मागे वळून पाहिलं , तर नक्कीच वाटेल कि जे घडलं ते बरोबरच घडलं , आपल्या फायद्यासाठीच घडलं. म्हणूनच आपण प्रत्येकाने प्रत्येक क्षणासाठी देवाचे आभार मानायला शिकलं पाहिजे. 

या गोष्टीतून आपण हाच धडा घेऊ शकतो कि देव असं घडवत नाही , जे आपल्याला हवं असतं , तो असं घडवत असतो , जे आपल्यासाठी योग्य असतं. 


©  प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १


🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे

  🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे  एक राजा होता. त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती. पण तो सुखी नव्हता. त्याला सतत वाटायचं कि मी दुःखी आहे...