आपली तुलना कोणाबरोबर करु नका
नमस्कार मुलांनो , एका जंगलात एक कावळा राहत होता. त्याला एकदा एक पांढराशुभ्र पक्षी दिसला. कावळा त्याच्याकडे गेला. त्याला त्याचं नाव विचारलं. पांढरा पक्षी म्हणाला , “ माझं नाव हंस आहे. “ कावळा म्हणाला , “ तू किती सुंदर आहेस !!! तुला तुझ्या जीवनात किती आनंद वाटत असेल ना ? ”
हंस म्हणाला , “ नाही रे , मी कसला सुंदर !! मी तर एकरंगी आहे. माझ्यापेक्षा तर
पोपट सुंदर आहे. कारण त्याला दोन रंग आहेत. तो अधिक आनंदी असेल , मी नव्हे !!! ” आता कावळा पोपटाकडे गेला.
कावळ्याने पाहिले. पोपटाच्या गळ्यात लाल रंग होता. स्वतः हिरवागार होता. कावळा पोपटाला म्हणाला , “ अरे मित्रा , तू किती सुंदर आहेस बघ ? तुझ्याइतका सुंदर कुणीच नसेल ना ? ” पोपट नम्रपणे म्हणाला , “ नाही रे , मी कसला सुंदर !! मी तर दोनरंगीच आहे. माझ्यापेक्षा तर मोर अतिसुंदर आहे . कारण त्याच्या अंगावर अनेक रंग आहेत. ” आता कावळा मोराला भेटायला निघाला.
जंगलात सगळीकडे शोध घेतला. मोर त्याला कुठेच दिसला नाही. त्याला एका पक्षी संग्रहालयात मोर दिसला. मोर पिंजऱ्यात बंद होता. मोराला बघायला अनेक पर्यटक येत होते. फोटो काढून घेत होते. सर्व लोक निघून गेल्यानंतर कावळा मोराकडे गेला. म्हणाला , “ तू तर सर्वात आनंदी आहेस , कारण तुला देवाने सर्व रंग प्रदान केले आहेत , तू किती सुंदर दिसतोस !! तुला बघण्यासाठी लोक येत असतात. फोटो काढून सेल्फी ठेवतात. ” मोराने शांत चित्ताने कावळ्याची प्रशंसा ऐकून घेतली. मोर म्हणाला , “ अरे बाबा , मी आनंदी अजिबात नाही , कारण मी तर पिंजऱ्यात बंद आहे. उलट तू मुक्त संचार करत आहेस , त्यामुळे तूच खरा आनंदी आहेस , तुला मुक्तपणे विहरताना बघून मलाच तुझा हेवा करावासा वाटतो. मी कावळा असतो तर बरे झाले असते.
मुलांनो , लक्षात ठेवा , आपण नेहमी शाळेत किंवा कुठेही आपली तुलना करत राहतो. त्यामुळे आपण किती भारी आहोत याची कल्पनाच करु शकत नाही. त्यामुळे तुमच्यात जे आहे , तेच तुमची ताकद आहे. तुमच्यातल्या असण्याची शक्ती वाढवा, तुम्ही जगातील महान व्यक्तिमत्त्व नक्कीच बनाल.
© प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक शिडवणे नं. १
No comments:
Post a Comment