Thursday, March 13, 2025

🔴 तुमच्यात माणुसकी असली पाहिजे

🔴 तुमच्यात माणुसकी असली पाहिजे 


नमस्कार मुलांनो , एकदा एक मोठ्या पदावरील साहेब आपल्या मुलाला घेऊन आपल्या भारीवाल्या गाडीने निघाले होते. मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांच्या पदाप्रमाणे त्यांच्यात अहंकार ठासून भरलेला होता. त्यामुळे आपल्या मुलालासुद्धा ते आपल्या पदाची आन , बान आणि शान समजून सांगत होते. मुलगा बिचारा ऐकत बसला होता. सगळ्याच गोष्टी समजण्याइतका तो मोठाही नव्हता. 

त्या साहेबांनी सीट बेल्ट घातला नव्हता. मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांना सीट बेल्ट कोणीही विचारणार नाही असा त्यांचा समज होता. एका वाहतुक पोलिसाने त्यांची गाडी अडवली. सीट बेल्ट बांधण्यासाठी विनंती केली. नाही बांधला तर चलन भरावे लागेल असेही सांगितले. परंतु मोठ्या पदावर असलेल्या साहेबांनी त्या पोलिसाला आपल्या पदाचा धाक दाखवला. आपल्या वरपर्यंत ओळखी आहेत असे सांगितले. पण वाहतूक पोलिसाने तरीही सीट बेल्ट बांधण्यासाठी आग्रह धरलाच. शेवटी नाईलाजास्तव त्यांना सीट बेल्ट बांधणं भाग पडलं. हे सर्व तो छोटा मुलगा पाहत होता. आपल्या बाबांच्या या वागण्याचा त्याच्या बालमनावर चांगला परिणाम होत नव्हता. 

गाडी पुढे निघाली. थोड्याच वेळात मागून मोठा आवाज झाला होता. साहेबांना गाडी थांबवावी लागली. मागे बघितलं तर एका गाडीने एका वृद्ध गृहस्थाला उडवलं होतं. त्या वाहतूक पोलिसाने मोठ्या साहेबांना विनंती केली , पण त्यांनी या अपघात झालेल्या वृद्धाला दवाखान्यात नेण्यास नकार दिला. अपघाती वृद्धाला तसंच टाकून आपली गाडी त्यांनी पुढे दामटली. 

बिचारा वाहतूक पोलीस नाराज झाला. त्याला त्या वृद्धाचे प्राण वाचवायचे होते. त्याने त्या वृद्धाला उचलले , चारशे ते पाचशे मीटरवर त्याला रुग्णवाहिका  मिळाली , त्याने त्या वृद्धाला हॉस्पिटलाईज केले. 

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्या वाहतुक पोलिसाचा फोटो पहिल्या पानावर छापून आला होता. त्याने एका वृद्धाचे प्राण वाचवले होते. साहेबांच्या घरीही पेपर आला होता. छोट्या मुलाने ती बातमी आपल्या साहेब असलेल्या बाबांना दाखवली. मुलाच्या मनात आपल्या बाबांविषयीचा आदर कमी झालेला त्यांना दिसला. साहेब बाबांनी मुलाकडे क्षमा मागितली आणि आपण चुकीचे असल्याचे मान्य केले. 

या गोष्टीवरून आपल्या असे लक्षात येते कि आपल्याकडे किती पैसा आहे किंवा कोणते पद आहे हे महत्त्वाचे नसून आपण माणसांशी माणसांसारखे वागतो का हे अधिक महत्त्वाचे असते. 


© प्रवीण अशितोष कुबल , प्राथमिक शिक्षक 


 

No comments:

Post a Comment

🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे

  🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे  एक राजा होता. त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती. पण तो सुखी नव्हता. त्याला सतत वाटायचं कि मी दुःखी आहे...