Thursday, March 13, 2025

तुमची प्रत्येक चूक तुम्हाला शिकवून जाते

 🔴तुमची प्रत्येक चूक तुम्हाला शिकवून जाते 


नमस्कार मुलांनो , पालकांनो आणि वाचकांनो , योग्य निर्णय घेणं खरंच खूप कठीण असतं. पण त्यापेक्षाही अधिक कठीण असतं , योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. 

दोन अरबी मित्रांची  गोष्ट आहे. त्यांना एका नकाशामध्ये असं समजलं कि दूर रेगीस्तानात खूप मोठा खजिना लपलेला आहे. आता दोन्ही मित्रांनी योजना आखायला सुरुवात केली होती. आपण कसं पोचायचं खजिन्यापर्यंत याचा दोघेही विचार करायला लागले होते. आपल्याला तो खजिना मिळालाच पाहिजे अशी दोघेही मित्र अपेक्षा बाळगून होते. 

खजिना खूप दूर होता. त्याच्यापर्यंत पोहोचणं खूप वेळखाऊ होतं. तसंच रेगीस्तानात मुबलक पाणीसुद्धा मिळणार नाही. तहानभुकेने व्याकुळ व्हायला होईल , कदाचित मरण येऊ शकतं ही भीतीसुद्धा त्यांना वाटत होतीच. त्यामुळे दोघांनीही असा निर्णय घेतला कि या कामामध्ये आपण अजून एकाला सामील करुन घेऊयात. त्यामुळे तिघांना तीन उंट नेता येणार होते. जास्तीचं सामानही नेता येणार होतं. येताना तिघांना जास्त खजिना आणता येणार होता. 

त्यांचे दोन मित्र होते. त्यांची नावे होती राम आणि श्याम. आता या दोघांपैकी कोणाला घेऊन जायचं हा त्यांना प्रश्न पडला होता. हे ठरवणं त्यांना कठीण जात होतं. कारण दोघांच्या क्षमता सारख्याच दिसत होत्या. मग त्यांनी ठरवलं कि दोघांमध्ये एक स्पर्धा घ्यायची आणि त्यातून कोणा एकालाच न्यायचं ते ठरवायचं होतं. त्यात जो यशस्वी होईल त्यालाच आपल्या सिक्रेट मिशनबद्दल सांगायचं होतं. स्पर्धा अशी होती कि दोघांनाही रेगीस्तानातील उंटावर बसविण्यात आलं होतं. त्यांना सांगण्यात आलं होतं कि असंच पुढे पुढे जायचं आणि योग्य रस्ता शोधायचा. 

दोघेही पुढे पुढे गेले. खूप पुढे गेल्यानंतर त्यातला राम डाव्या बाजूला जायला निघाला. श्याम मात्र तिथेच थांबून राहिला. त्याला कुठे जायचं ते समजेना. तो द्विधा मनस्थितीत होता. थोड्या वेळाने राम परत निघून आला आणि तिकडे जाऊ शकत नाही असे सांगू लागला. कारण त्या बाजूला खूप मोठ्या समस्या होत्या. त्यामुळे तो त्या समस्यांना पार केल्यामुळे परत आला. श्याम मात्र तिथेच थांबून राहिल्याने त्याला कोणता रस्ता चांगला किंवा योग्य हे सांगता येत नव्हते. 

राम आणि श्याम कोठे जात होते यावर दोन्ही अरबी मित्रांचे लक्ष होतेच. त्यांनी या दोन मित्रांमधून रामची निवड केली. श्यामला समजेना. चुकीच्या रस्त्याला जाणाऱ्या रामची निवड त्याला योग्य वाटेना. दोन्ही अरबी मित्रांनी त्याला नीट समजावून सांगितले. आपल्याला काय करायचे नाही , हे आधी समजले पाहिजे , तर आणि तरच आपण काय करायचे आहे हे समजू शकतो. रामने तेच केलं होतं. त्याने चुकीचा रस्ता शोधून काढला , त्यामुळे बरोबर रस्ता कोणता आहे , हे त्यानेच ठरवले होते. म्हणून रामची केलेली निवड योग्यच असल्याचे श्यामलाही पटले. 

मित्रांनो , आपण सुद्धा जीवनात असे अनेक चुकीचे मार्ग निवडलेले असू शकतो , पण वेळीच आपल्याला समजलं , तर आपण त्या अयोग्य मार्गांचा त्याग करुन योग्य मार्गावर येऊ शकतो. म्हणूनच म्हणतात , “ तुमची प्रत्येक चूक तुम्हाला शिकवून जाते . ”


© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १


No comments:

Post a Comment

🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे

  🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे  एक राजा होता. त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती. पण तो सुखी नव्हता. त्याला सतत वाटायचं कि मी दुःखी आहे...