🔴 भुतदया असायलाच हवी
नमस्कार मुलांनो , एकदा एक ऑफिसर आपल्या पत्नीसमवेत फेरफटका मारत होते. त्यावेळी वाटेत एक जंगल होते. जंगलात झाडांवर पक्ष्यांनी सुंदर घरटी बांधली होती. त्यात सुगरण पक्ष्यांची घरटी लक्षवेधक होती. ऑफिसरच्या पत्नीला ती घरटी खूपच आवडली.
ती आपल्या अधिकारी पतीला म्हणाली , “ आपल्या घरात ही घरटी सुशोभनासाठी वापरली तर घराची शोभा आणखी वाढेल. ” अधिकारी पतीलाही तिचे म्हणणे पटले. अधिकारी महाशयांनी जवळच असणाऱ्या एका गावरान मुलाला बोलावून घेतले. त्याला म्हटले , “ बाळा , मला या घरट्यांमधली दोन तीन घरटी काढून दे. मी तुला त्याबदल्यात मोबदला देतो. ” त्या मुलाने त्या घरट्यांकडे पाहिले व म्हणाला , “ साहेब , मी तुम्हाला ही घरटी नक्कीच काढून दिली असती , पण सध्या त्यात सुगरणीची छोटी छोटी पिल्ले राहत आहेत. तिची आई सायंकाळी खाऊ घेऊन येईल , तेव्हा तिला आपली पिल्ले दिसणार नाहीत, तेव्हा तिला जे दुःख होईल , ते दुःख मला सहन होणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला यातील कोणतीही घरटी काढून देऊ शकत नाही. मला तुमचा मोबदला नको. ”
अधिकारी आणि त्याची पत्नी दोघेही उच्चविद्याविभुषित होते. त्यांना ‘ प्राणिमात्रांवर दया करावी ‘ ही गोष्ट माहिती होती. तरीही या न शिकलेल्या गावरान मुलाकडून त्यांना ‘ भुतदया ‘ शिकायला मिळाली. मुलाच्या या भुतदयेबद्दल दांपत्याच्या मनात आदर निर्माण झाला आणि त्यांनी त्याला खूप सारे खाऊ देऊन मनोमन आभार मानले. मुलगासुद्धा त्यांना दुवा देत आपल्या वाटेने निघून गेला.
बालमित्रांनो , आपल्याला आपल्या सभोवती असलेल्या निसर्गातील प्राण्यांबद्दल , पक्ष्यांबद्दल अशीच अपार दया असली पाहिजे. आपल्यापासून त्यांना कोणताही त्रास होईल असे पण वागता कामा नये. या मुक्या प्राण्यांना बोलता येत नसले तरी त्यांच्यावर माया केलीत तर तेही तुमच्यावर जिवापाड प्रेम करतात याचाही तुम्हाला अनेकदा अनुभव आला असेल. त्यामुळे तुमच्या मनात प्राणिमात्रांबद्दल जे प्रेम असते त्याला भुतदया असे म्हणतात. भुतांवर दया करणे म्हणजे भुतदया नव्हे हं !!!
© प्रवीण अशितोष कुबल , प्राथमिक शिक्षक
No comments:
Post a Comment