Thursday, March 13, 2025

🔴स्वतःची कामे स्वतःच करा

 🔴स्वतःची कामे स्वतःच करा 

नमस्कार मुलांनो , तुम्हाला गुरुजींच्या आणि शिष्यांच्या गोष्टी आवडत 

असतीलच ना !!! एकदा एक गुरुजी आपल्या शिष्यांना घेऊन दुर निघाले होते. वाटेत त्यांना एक गटार लागले. ज्यातून खूप घाणेरडे पाणी वाहून जाताना दिसत होते. त्यावर पूल बांधलेला नव्हता. त्यामुळे त्यावरुन उडी मारुन जावे लागणार होते. 

सर्व शिष्यांनी उड्या मारुन पलीकडे जाण्याचं कार्य पूर्ण केलं. आता गुरुजींची पाळी आली होती. गुरुजी उडी मारुन गेले. परंतु उडी मारताना त्यांच्या हातातलं कमंडलू मात्र निसटून खाली गटारात पडलं. आता ते खूप खाली गेलं होतं . वाहून जात असल्याने ते दिसेनासं झालं. सगळे शिष्य हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी पाहात राहिले होते. कोणाचेही धाडस ते कमंडलू बाहेर काढण्यासाठी होताना दिसत नव्हतं. 

गुरुजींनी सर्व मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले होते. पण आज मात्र त्यांचा एकही शिष्य त्यापैकी काहीही करायला तयार होताना दिसत नव्हता. अखेर त्यातील एक शिष्य म्हणाला , “ गुरुजी , मी गावात जातो आणि आपले कमंडलू बाहेर काढणारा माणूस घेऊन येतो. ” गुरुजींना वाटले होते कि हा आपला शिष्य स्वतः गटारात उडी मारणार आणि आपला कमंडलू बाहेर काढणार. पण त्यांचा हा विचारही अमलात आणला गेला नव्हता. 

इतक्यात गुरुजींचा एक पट्टशिष्य धावतच तिथे आला. त्याने पाहिलं कि आपल्या गुरुजींचं कमंडलू गटारात पडलं आहे आणि ते सापडत नाही. ते शोधून काढणं हे आपलं परमकर्तव्य आहे. त्याने त्या घाण वास येणाऱ्या गटारात थेट उडी मारली आणि अधिक खोलात गेल्यावर त्याला गुरुजींचं कमंडलू सापडलं. त्याने ते अतिशय उत्साहात गुरुजींकडे आणून दिलं तेव्हा गुरुजींचे इतर सर्व शिष्य आ वासून पाहण्यापलीकडे काहीही करु शकत नव्हते. 

तो शिष्य गुरुजींना म्हणाला , “ गुरुजी , मी तुमचं कमंडलू बाहेर काढून देऊन खूप मोठे उपकार केलेले नाहीत. तुम्ही आम्हाला इतकी वर्षं अध्यापन करत आहात. तेव्हा तुम्ही आम्हाला शिकविलेल्या गोष्टीचा आज खऱ्या अर्थाने व्यावहारिक उपयोग झालेला आहे. मलाही तुम्हाला केलेल्या सहकार्यामुळे झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. ” कमंडलू काढणारा माणूस शोधणारा शिष्य देखील आला , तेव्हा त्यालाही आपली लाज वाटली. कारण तो कोणाही माणसाला न आणता रिकामाच आला होता. 

मित्रांनो , आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येत असतात. आपण आपलीच कामे करायला कचरतो. आपली कामे दुसऱ्यांकडून करुन घेण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवलं पाहिजे कि कितीही काहीही झालं तरी आपली कामे आपल्यालाच करायची आहेत. त्यासाठी कधीच दुसऱ्यांवर विसंबून राहायचे नाही. कारण म्हणतात ना !!! जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. 


© प्रवीण अशितोष कुबल , प्राथमिक शिक्षक 


No comments:

Post a Comment

🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे

  🔴 जे मिळालं आहे , तेच खूप आहे  एक राजा होता. त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती. पण तो सुखी नव्हता. त्याला सतत वाटायचं कि मी दुःखी आहे...